ड्युक्स नोज, नागफणी, Dukes Nose, nagfani, khandala, bhatkanti.
Table of Contents
सह्याद्री पर्वतरांगेतील अजून एक प्रचंड व विशाल स्वरूप म्हणजे “ड्युक्स नोज” किवां त्याला स्थानिक भाषेत “नागफणी” असे म्हणतात.
पुणे-मुंबईच्या दरम्यान खंडाळ्यामध्ये ड्युक्स नोज हा विशाल सुळका गगना मध्ये भिडलेला आपल्याला दिसतो.
ड्युक्स नोज कडे पाहता सह्याद्रीच्या भेदक व प्रचंड स्वरूपाची आपल्याला अनुभूती होते आणि मग त्या प्रचंड स्वरूपाचा अनुभव घेण्यासाठी गडभटक्यांची पावले आपणहून त्या दिशेने चालायला लागतात.
ड्युक्स नोज हा किल्ला नसून तो एक सुळका आहे, ज्याचा आकार नागाच्या फण्या प्रमाणे भासतो.ड्युक्स नोज हे नाव ड्यूक वेलिंग्टन यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे, ज्यांचे नाक खडकासारखे टोकदार होते.
ड्युक्स नोज वर तुम्ही वर्षाविहाराचा आनंद घेऊ शकता, तसेच खंडाळ्याचे थंड वातावरण व निसर्ग सौंदर्य ह्या बद्दल वेगळे काय सांगायचे, तसेच ज्यांना पायपीट करायची आहे त्यांची ती पण इच्छा इथे पूर्ण होते.
ड्युक्स नोज कुठे आहे?|Where is the dukes nose?
ड्युक्स नोज खंडाळा घाटामध्ये खाली उतरल्यावर डाव्याबाजूला मोठा सुळका दिसतो तो म्हणजे ड्युक्स नोज. पुणे पासून ड्युक्स नोज ७१ km आहे, तसेच मुंबई पासून ८३ km आहे. म्हणजे आपण २-३ तासामध्ये ड्युक्स नोज ला पोचू शकतो.
ड्युक्स नोजला कसे पोहोचायचे? | How to reach Dukes Nose?
ड्युक्स नोजला जाण्यासाठी सोयीचे २ रस्ते आहेत, पहिला हा सोप्पां मार्ग आहे जो कुरवंडे गावामधून सुरु होतो. गावांमध्ये जाण्यासाठी आपल्याला लोणावळ्यात पोचायला लागते व तिथून कुरवंडे गावांमध्ये जाता येते (खंडाळ्या मधून जाणाऱ्या रस्त्या पेक्षा कुरवंडे गावातील रस्ता सोप्पां आहे).
दुसरा रस्ता हा खंडाळा रेल्वे स्टेशन पासून सुरु होतो, त्यासाठी तुम्हाला रेल्वे हा सर्वात सोयीस्कर वाहतूक पर्याय आहे. खंडाळ्या पासूनचा रस्ता हा ट्रेक करण्यासाठी सुंदर आहे रस्त्यात जंगल, झरे,धबधबे पाहायला मिळतात. हा रस्ता खंडाळा रेल्वे स्टेशन पासून डाव्याबाजूला बंद पडलेल्या रेल्वे रूळा पासून सुरु होतो, हा रस्ता १० ते १२ km चा आहे.

पायवाटेवर भेटलेला सरपटणारा पाहुणा.
ट्रेकिंग व कॅम्पिंग | Trekking and camping:
ट्रेकसाठी आपण खंडाळ्याच्या घाटामधून जाणारी वाट पाहू, वर पहिल्या प्रमाणे ह्यासाठी आपल्याला रेल्वे पकडायला लागेल, पुण्याकडून जाण्यासाठी आपण पहाटे ६:१० ची सिंहगड एक्सप्रेस पकडू शकतो (रेल्वेचे वेळापत्रक पाहून जावे).
आपल्याला लोणावळा किवां कर्जत चे तिकीट काढायला लागते कारण खंडाळा हा सिंहगड एक्सप्रेस चा technical stop आहे, त्यामुळे इथे गाडी जास्तीत जास्त २-३ मिनट थांबते. खंडाळ्या मध्ये गाडी ने सुद्धा जाता येते पण सुळक्या वरून खाली उतरायला कुरवंडे गावंचा रस्ता सोयीचा आहे त्यामुळे खूप मोठा वळसा पडू शकतो म्हणून रेल्वे ने जाणे सोयीचे आहे.
पुढे रेल्वे स्टेशन पासून डाव्याबाजूला बंद पडलेला रेल्वे रूळ आहे तेच्या सोबत प्रवास सुरु करायचा, हा रस्ता तुम्हाला थेट बंगल्यांच्या बाजूला घेऊन जातो. बाजूलाच तुम्हाला एक तलाव पाहायला मिळतो, बंगल्यान पासून पुढे पायवाट सुरु होते, पुढे आपल्याला पाण्याचे मोठे पाईप दिसतात तेच्या खालून आपण जातो.
इथूनच पुढे आपल्याला झरे पाहायला मिळतात, पाऊस झाल्यावर त्यांना भरपूर पाणी असते, मध्ये काही मोठे धबधबे आहेत तिथे जरा सांभाळून जावे लागते कारण खडका वरील शेवाळ्या मुळे पाय घसरायचा धोका असतो. पण इथे थांबून थंड पाण्याचा आनंद घेतल्या शिवाय पाय पुढे जात नाहीत, जर तुम्ही ग्रुप मध्ये असाल तर ग्रुपलिडर तुम्हाला इथे पाण्यात खेळायला वेळ नक्की देतो.

तेथून पुढे थोडी चढाई करायला लागते, जर काहीच सवय नसेल तर हा टप्पा थोडा कठीण जातो. सुरु केल्या पासून २ तासामध्ये आपण सुळक्याचा बाजूला असलेल्या पठारावर पोचतो त्याला डचेस नोज असे म्हणतात.
तेथून पुढे आपल्याला दोन रस्ते म्हणजे डावीकडे व उजवीकडे जाताना दिसतील, डावीकडील रस्ता हा मुख्यता रॅपलिंग करून येणारे लोकं वापरतात, डाव्या बाजूने गेल्यावर तुम्हाला ड्युक्स नोज चे पूर्ण विशाल स्वरूप जवळून पाहता येते, ते पाहून परत जेथून डावी कडे वळलो तेथून पुढे सरळ गेल्यावर आपण ड्युक्स नोजच्या पायवाटे पर्यंत पोहोचतो, इथून पुढे जंगल खूप विरळ असल्यामुळे थंड हवा सुरु होते. इथून आपण अगदीच 25-30 मिनिट मध्ये ड्युक्स नोजच्या पठारावर पोहचतो.

पठारावर शिव शंकराचे मंदिर आहे, पठारावर पोचल्यावर कष्टाचे समाधान होते. इथेच बसून बरेच जण पोटात पडलेली आग शांत करतात. पठारावर पिण्याच्या पाण्याची काहीच सोय नसल्याने आपण सोबत गरजे प्रमाणे पाणी घेऊन जावे. खाली येताना परत खंडाळा रेल्वेच्या रस्त्याने न जाता बरेच जण कुरवंडे गावा बाजुच्या रस्त्याने खाली उतरतात कारण हा रस्ता सरळ व सोप्पां आहे.
कुरवंडे गावामध्ये आपल्याला पिण्याच्या पाण्याची व चहाची नाश्त्याची सोय होते. कुरवंडे गावामधून पुढील प्रवासासाठी गाड्यांची सुद्धा सोय होते. रिक्षा आपल्याला लोणावळा रेल्वे स्टेशन ला सोडते, ट्रेक वेळेत झाला तर परतीची ४.३० किवां ५.३० ची रेल्वे आपल्याल परत शिवाजी नगर स्टेशन ला सोडते, लोणावळ्या मध्ये बस सेवा सुद्धा आहेत, फक्त बस चे वेळापत्रक पाहून घेतलेले चांगले.
दुसरा मार्ग हा लोणावळ्या पासून सुरु होतो, ह्या मार्गावर तुम्ही स्वतःच्या गाडी ने सुद्धा प्रवास करू शकता, कुरवंडे गावा मध्ये गाडी लावून पुढचा प्रवास आपण करू शकतो.
कुरवंडे गावा पासून ड्युक्स नोज साठीचा कच्चा रस्ता सुरु होतो, गावा मध्ये कोणालाही पायवाट विचारली तरी ते तुम्हाला सांगतील, पुढे पाण्याच्या पाईप दिसतो त्याला मागे सोडून उजव्या बाजूने वर चढायला सुरवात करावी, पायवाटे मध्ये तुटलेल्या पायऱ्या सुद्धा दिसतात. हाच रस्ता आपल्याला पठारावर घेऊन जातो. ह्या रस्त्याने पठारावर पोचायला आपल्याला १-२ तास लागतात.
जर तुम्हाला जंगलाचा अनुभव घेत पाण्यातून वाट काढत १० ते १२ km चा ट्रेक करायचा असेल तर तुमच्या साठी खंडाळ्याची वाट उत्तम आहे. आणि जर फोटोग्राफी तसेच थंड हवा आणि थोडी पायपीट करत सुंदर निसर्गाचा अनुभव घेयचा असेल तर कुरवंडे गावंचा रस्ता चांगला आहे.
तर अश्या कणखर व भव्य ड्युक्स नोजला नक्की भेट द्या व तुमचा अनुभव आमच्या सोबत शेअर करा. आम्ही मराठी Geeks ब्लॉग वरून आपल्या मराठी मातीची व रांगडे पणाची ओळख व अनुभूती सर्वांना करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत, तरी आपल्या प्रतिक्रिया व अनुभव आम्हाला पण सांगा.